लोकलमधील मोबाईल चोराचा पाठलाग करताना शकील अब्दुल गफार शेख या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना चर्नी रोड स्थानकात उघडकीस आली. जोगेश्वरी येथे राहणाऱ्या ५३ वर्षीय शकील शेख यांनी चर्चगेट येथे जाण्यासाठी रविवारी पहाटे लोकल पकडली. शेख हे घरी एकटेच कमावते होते. काही दिवसांपूर्वीच घरातील मोठ्या मुलाची नोकरी सुटल्याने शेख कुटुंबीय तणावाखाली होते. यातच घरातील कमावता पुरुष गेल्यामुळे शेख परिवारावर दोन्ही बाजूने आघात झाला आहे. या प्रकरणी मोबाईल चोराला रेल्वे पोलिसांनी अटक केली.
रविवार सकाळची वेळ असल्याने लोकलमध्ये तुरळक प्रवासी होते. पहाटे ६.४५च्या सुमारास लोकल चर्नी रोड स्थानकात पोहोचताच आरोपीने शकील यांचा मोबाईल हिसकावून धावत्या लोकलमधून फलाटावर उतरून पळ काढला. शकील यांनी चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. शकील यांनी फलाटावर उडी मारली. मात्र लोकलच्या वेगाचा अंदाज न आल्याने फलाट आणि लोकल यांच्या पोकळीत चेंगरून शेख यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

