प्रदूषणमुक्तीसाठी जलस्त्रोतांच्या रक्षणासाठी स्काऊट गाईडने सहभागी व्हावे – शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन
शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते स्काऊट गाईडसचा सन्मान
मुंबई, दि. 8: गणेशोत्सव साजरा करताना जलशक्ती आणि जलस्त्रोताला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी निर्माल्यासह प्लॅस्टिक जाणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यात स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संस्थेतर्फे आयोजित राज्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात ॲड. शेलार बोलत होते. यावेळी सन 2016-2017 साठी अहमदपुर लातूरचे धुंडिराज लोहारे सन 2017-2018 साठी नांदेड येथील दिगंबर फुलारी यांना प्रा. बापूसाहेब टी. पी. महाले जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच स्काऊट गाईडस् अभ्यासक्रमातील राज्य पुरस्कार, स्काऊट गाईड प्रमाणपत्र, बार टू मेडल ऑफ मेरीट या पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले.
ॲड. शेलार म्हणाले, स्काऊट गाईडमधून चांगला नागरिक निर्माण व्हावेत, यासाठी ही चळवळ आहे. ही चळवळ ध्येय ठेवून काम करीत आहे. आजचे पुरस्कार हे चांगल्या कामाची पावती आहे. देशसेवेसाठी करता येईल ते करण्याची शपथ आपण या चळवळीमध्ये घेत असतो. देशप्रेम हे संस्कार आहेत. देशसेवा करण्यासाठी सैनिकाप्रमाणे सीमेवर जाणे आवश्यक नाही. स्काऊट गाईड हे देशात राहूनही सेवेचे व्रत पूर्ण करु शकतात.
यावेळी स्काऊट गाईड राज्य संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे, मुख्य प्रशासक शरद उघडे, संतोष मानूरकर, कार्तिक मुंडे आदी उपस्थित होते.
स्काऊट गाईड अभ्यासक्रमातील राज्य पुरस्कार हा राज्यस्तरावरील सर्वोच्च पुरस्कार आहे. राज्य पुरस्काराची चाचणी राज्यस्तरावर राज्य संघटन आयुक्त (स्काऊट) व राज्य संघटन आयुक्त (गाईड) यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात येते. सन 2016- 2017 व 2017-2018 या दोन वर्षात यावर्षी 3881 स्काऊट व 3396 गाईड यांनी यशस्वीपणे या चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
महाराष्ट्रातील राज्य पुरस्कार स्काऊट गाईडची संख्या जास्त असल्याने या चाचण्या विभागनिहाय मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ येथील प्रशिक्षण केंद्रांवर आयोजित केल्या जातात. यामुळे चाचणी देण्यासाठी स्काऊट गाईडना फार दूर जावे लागत नाही. स्काऊट गाईडना रेल्वे व एस. टी. च्या प्रवास खर्चात 50% सवलत दिली जाते. या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या स्काऊट गाईडना महामहिम राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्राप्त होते.
Scout Guide to Participate in Protecting Water Resources for Pollution-Free a Education Minister, Adv. Appeal from Ashish Shelar
