मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना शपथ दिली.
Chief Minister Uddhav Thackeray including Nine members took oath as members of the Legislative Council
आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम दिवाकर गोऱ्हे, शशिकांत जयवंतराव शिंदे, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड, प्रविण प्रभाकरराव दटके, गोपिचंद कुंडलिक पडळकर, अमोल रामकृष्ण मिटकरी, राजेश धोंडीराम राठोड यांचा समावेश होता.

अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. विधीमंडळात हा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची शपथ घेतली. शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात असे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. गेले अनेक दिवस मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीवरून कोरोनाच्या संकटातही राजकीय वातावरण जरा तापलेले होते.
कधी विरोधक तर कधी सहकारी पक्ष अशा अनेक आडकाठ्या बाजूला करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आमदारकीची अखेर बिनविरोध निवड झाली व आज त्यांनी आमदारकीची शपथ घेतली.विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषद सदस्य निवडीचे प्रमाणपत्र दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत विधीमंडळ सचिव राजेंद्र भागव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, कृषिमंत्री दादाजी भुसे, परिवहनमंत्री अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे आदींसह सदस्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.



