Health & Fitnessआरोग्यमुंबई

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाखांच्या वर ; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

मुंबई : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे . सध्याच्या घडीला देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या १० लाख ४ हजार ५९० इतकी झाली आहे. ज्यापैकी ६ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात ३ लाख ४२ हजार रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. तर आत्तापर्यंत देशभरात कोरोनाची लागण होऊन २५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

देशाची चिंता वाढली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचीही चिंता वाढली आहे कारण महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८ हजार ६४१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार २८१ इतकी झाली आहे.

देशभरात साधारणतः ३० हजार नवे रुग्ण रोज पॉझिटिव्ह आढळत आहेत. हे असले तरीही देशातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थातच रिकव्हरी रेट हा ६३.२५ टक्के इतका झाला आहे. आपल्या देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

सर्वाधिक कोरोना प्रभावित  महाराष्ट्रासह (7,975), तामिळनाडू (4,496), कर्नाटक (3,176), आंध्र प्रदेश (2,432), दिल्ली (1,647), उत्तर प्रदेश (1,659) तसेच पश्चिम बंगालमध्ये (1,589) कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. या राज्यांच्या पाठोपाठ तेलंगणा (1,597), बिहार (1,328),  गुजरात (915), राजस्थान (866), केरळ (623) तसेच मध्य प्रदेशात (638) कोरोनाबाधितांची भर पडली.

मागील चोवीस तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक 233 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक 87, तामिळनाडू 68, आंध्र प्रदेश 44, दिल्ली 41, पश्चिम बंगाल 20, तेलंगणा 11, गुजरात 10 तसेच मध्य प्रदेशात 9 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील मृत्यू दर हा 4 टक्के नोंदवण्यात आला आहे. तर जगाच्या 4.40 टक्के मृत्यू दराच्या तुलनेत गुजरातमधील कोरोना मृत्यू दर सर्वाधिक म्हणजे 4.75 टक्के नोंदवण्यात आला आहे.

बुधवारी दिवसभरात देशातील 3 लाख 42 हजार 237 नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी 27 लाख 39 हजार 490 नागरिकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

गेल्या एका दिवसात बीएसएफमधील 68 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बीएसएफमधील कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे 2 हजार 93 झाली असून, यातील 1 हजार 60 जवानांनी कोरोनावर मात मिळवली आहे. 1 हजार 24 जवानांवर उपचार सुरू आहेत. तर आयटीबीपीमध्ये 35 जवानांमध्ये कोरोना संसर्ग आढळला आहे. आयटीबीपीतील 356 जवानांनी कोरोनावर मात मिळवली आहे. 348 जवानांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना संसर्गासोबत दोन हात करताना आतापर्यंत देशभरात 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिली आहे. ‘आयएमए’ने ‘रेड अलर्ट’ जारी करून रुग्णालये तसेच वैद्यकीय प्रशासकांना डॉक्टरांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘आयएमए’कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोनाविरोधातील युद्धात आघाडीवर लढत असलेल्या 1 हजार 302 डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली. तर 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला. यातील 73 डॉक्टरांचे वय हे 50 वर्षांहून जास्त नव्हते. 35 ते 50 वयोगटातील 19 आणि 35 हून कमी वय असलेल्या सात डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button