आयपीएल 2021 (IPL 2021) साठी पूर्वतयारी जोरात आहे. फ्रँचाईजीनी कायम ठेवायचे खेळाडू व मुक्त केलेले खेळाडू अशी यादी जाहीर केलेली आहे. 18 फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. त्याआधी खेळाडूंनी आपआपले किमान मुल्य जाहीर केले आहे. त्यात ज्यांनी आपली बेस प्राईस सर्वाधिक दोन कोटींची ठेवली आहे त्या 11 खेळाडूंची यादी मोठी गमतीशीर असून क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
या 11 खेळाडूंमध्ये कोण कोण आहेत तर..
1) ग्लेन मॅक्सवेल
2) हरभजन सिंग
3) केदार जाधव
4) स्टिव्ह स्मिथ
5) मोईन अली
6) शकिब अल हसन
7) सॕम बिलिंग्ज
8) लियाम प्लंकेट
9) जेसन रॉय
10) मार्क वूड आणि
11) कॉलिन इंग्राम
आता ही यादी पाहिली तर यातील स्टिव्ह स्मिथ, शकिब अल हसन व जेसन रॉय हे काही खेळाडू सोडले तर दोन कोटींची बेस प्राईस हे खेळाडू कशाच्या आधारावर मागत आहे आणि कोण त्यांच्यासाठी एवढे पैसे मोजेल हा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. यापैकी बहुतेक जण तर ‘अनसोल्ड’ ठरतील म्हणजे त्यांना कुणीच आपल्या 25 खेळाडूंमध्येसुध्दा स्थान देणार नाही असे भाकित बहुतेकांनी वर्तवले आहे.
सर्वात थट्टेचा विषय ठरलेय ते हरभजनसिंग व केदार जाधव. आता जवळपास कालबाह्य ठरलेल्या हरभजनसाठी दोन कोटी कोण मोजणार असा प्रश्न काहींना पडलाय तर केदार जाधवबद्दल तर अनेकांनी उपरोधिकपणे म्हटलेय की ‘कान्फिडन्स असावा तर असा!’ सर्वांनाच माहित आहे की 2020 च्या आयपीएलमध्ये सीएसके कडून खेळताना केदार जाधव सपशेल अपयशी ठरला होता. 8 सामन्यात त्याने फक्त 62 धावा केल्या होत्या आणि 26 धावांची त्याची सर्वोच्च खेळी होती. 2019 मध्येही 14 सामन्यांत त्याची एकच अर्धशतकी खेळी होती तर 2018 मध्ये तर तो एकच सामना खेळला होता. त्यामुळे केदार जाधवने आपली बेस प्राईस दोन कोटी ठेवावी याचेच सर्वांना आश्चर्य वाटले.
2018, 19 व 20 अशा तिन्ही वर्षी सीएसकेने त्याच्यासाठी तब्बल 7 कोटी 80 लाखाची घसघशीत किंमत मोजली होती. त्याच्याआधी 2017 मध्ये रॉयल चॕलेंजर्स बंगलोरने त्याच्यासाठी 2 कोटी 17 लाख 50 हजार किंमत दिली होती. 2013 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला 20 लाखाची किंमत दिली होती. त्याच दिल्लीने एकाच वर्षात त्याला दहा पट अधिक रक्कम म्हणजे दोन कोटी रुपये दिले होते.
हा इतिहास असला तरी त्याला आता दोन कोटी किंमत मिळेल का ह्याबद्दल बहुतेकांना शंका आहे.
