पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या सामन्याचा पहिला दिवस गाजवला. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे भरवशाचे फलंदाज स्वस्तात माघारी गेले. पण काही दिवसांपासून लय हरवलेल्या रोहित शर्माला आज सूर गवसला. या टीकाकारांना रोहितने दुसऱ्या कसोटीत दमदार प्रत्युत्तर दिलं. गोलंदाजांसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर रोहितने गोलंदाजांचाच समाचार घेतला. आक्रमक अंदाजात फलंदाजी करत त्याने पहिल्याच दिवशी दीडशतकी मजल मारली आणि महत्त्वाचा विक्रम आपल्या नावे केला.
रोहितने या सामन्यात शतक झळकावले आणि हे शतक भारतीय संघासाठी स्पेशल ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण आतापर्यंत या वर्षात एकाही भारतीय खेळाडूला शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे भारताकडून यावर्षी पहिले शतक झळकावण्याचा मान रोहितने पटकावला आहे. त्यामुळे या वर्षात रोहित शर्माकडून आणखी किती शतके पाहायला मिळतात, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. रोहितने यावेळी इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीच्या चेंडूवर दुहेरी धाव घेत आपले शतक साजरे केले.
1⃣5⃣0⃣ up for Rohit Sharma!
Can he convert this into a double century?#INDvENG | https://t.co/DSmqrU68EB pic.twitter.com/xXSweL4onG
— ICC (@ICC) February 13, 2021
भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे आले. गिल शून्यावर माघारी परतला. पण रोहितने मात्र दमदार खेळ सुरू ठेवला. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा वेळोवेळी समाचार घेतला. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली दोघे स्वस्तात बाद झाले, पण मुंबईकर अजिंक्य रहाणेने रोहितला साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यात रोहित शर्माने शतकी मजल मारली. त्याचसोबत श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चारही संघांविरूद्ध सर्व फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा रोहित पहिला खेळाडू ठरला.
रोहितने १३० चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने शतक ठोकलं. घरच्या मैदानावर कमीत कमी १० कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सरासरीच्या बाबतीत रोहितने जगात दुसरं स्थान पटकावलं. या यादीत ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन ९८.२ च्या सरासरीने अव्वल आहेत. तर रोहितची सरासरी ८४.७ इतकी आहेत. तर यादीत वेस्ट इंडिजचे जॉर्ज हेडली ७७.६च्या सरासरीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियातील कसोटी सामने आणि इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितला चांगली सुरूवात मिळूनही त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करणं शक्य होत नव्हते. पण दुसऱ्या कसोटीत त्याने दीडशतकी मजल मारली.
