उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीत देता येणार!
मुंबई: राज्यात यंदा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी घेतल्या जाणार आहेत असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. विद्यापीठाकडून हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे दोन्ही पर्याय ऐच्छिक असल्यामुळे परीक्षा ऑनलाईन द्यायची की ऑफलाईन, याचा निर्णय आता विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच, ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना करोनासंदर्भातल्या नियमांचं पालन करूनच परीक्षा देता येणार आहे.
तसेच इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या १०० टक्के ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. त्यानुसार या परीक्षांचं नियोजन केलं जाईल, असं उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचा गोंधळ काहीसा कमी होण्यास मदत झाली आहे.
या परीक्षांचा निर्णय झाला असला, तरी अद्याप शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेतल्या जाणार? याविषयी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात देखील राज्य सरकार विचार करत असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या यासंदर्भातल्या निर्णयाची प्रतीक्षा आता विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे.