Festival (फेस्टिव्हल)Maharashtra Gov

पंढरीची वारी आता ग्लोबल मंचावर; डिस्कव्हरी-जिओग्राफी चॅनेलवरून होणार थेट दर्शन

Ashadi Wari 2026 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारीसाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे. यंदाच्या वारीत लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून नियोजन करण्यात येणार आहे. यंदाचा वारी सोहळा डिस्कव्हरी आणि जिओग्राफीसारख्या ग्लोबल चॅनल्सच्या माध्यमातून जगभर पोहोचणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली.

पालखी मार्गावरील रस्ते अधिक सुरक्षित
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदाच्या वारीसाठी पालखी मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. तसेच पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

मुक्कामस्थळी आधुनिक सुविधा
वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी यंदा मोठ्या प्रमाणात आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध पालख्यांच्या मुक्कामस्थळी सुरक्षित आणि प्रशस्त निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे विभागाबाहेरील पालख्यांनाही आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नोडल पालकमंत्री तर पुणे विभागीय आयुक्त नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

महिलांच्या सुरक्षेसह सर्व सुविधांवर भर
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, पालखी सोहळ्याशी संबंधित सर्व कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. विशेषतः महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीच्या मुक्कामस्थळी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा यावरही भर दिला जाणार आहे.

आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्माचा आत्मा आहे. लाखो भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक सोयी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यंदाची वारी अधिक सुरक्षित, सुकर आणि आठवणीत राहण्यासाठी शासन पुरेपुर प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button