AgriculturalFarmersडिजिटल महाराष्ट्र वार्तापीक बाजारभावसरकारी योजना

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! 30 जूनपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू असून 30 जूनपूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. माध्यमांशी संवाध साधताना भरणे यांनी असे म्हटले की, वर्ष 2019 मध्ये लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा मिळणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील सुमारे 56 लाख 24 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी तब्बल 36 हजार 585 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले आहे.

56 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ
राज्य सरकारच्या नव्या कर्जमाफी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतेक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत माहिती देताना राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफीसंदर्भातील संदेश मोबाईलवर पाठविण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

दोन लाखांपर्यंतचे पीककर्ज होणार माफ
राज्य सरकारने कर्जमाफी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल यंत्रणा विकसित केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. यामध्ये अल्पमुदतीचे, पुनर्गठित तसेच पुनर्रचित कर्जाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचाही लाभ
ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने ‘वन टाइम सेटलमेंट’ योजना लागू केली आहे. या माध्यमातून थकीत कर्जदारांना पुन्हा कर्जपात्र बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि ग्रामीण बँकांना आवश्यक निर्देश देण्यात आले असून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित तक्रारी आणि मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि सहकारमंत्री यांचा समावेश असलेला मंत्रिगटही कार्यरत आहे.

सरकारचा दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कर्जमाफी केवळ राजकीय निर्णय नसून शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. 36,585 कोटी रुपयांच्या या कर्जमाफी पॅकेजचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून महाराष्ट्राच्या इतिहासातील हा सर्वात मोठा कर्जमाफी उपक्रम ठरणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12.71 लाख शेतकऱ्यांनाही अतिरिक्त दिलासा देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.

Related Articles

Back to top button