नागपाडा सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग, ४० अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
मुंबई: नवरात्र उत्सवाचा आनंद आणि अनलॉक 5 च्या टप्प्यात सुरू झालेल्या मॉलमध्ये भीषण अग्नितांडव झाला आहे. मुंबई सेंट्रलच्या नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग लागली असून गेल्या बारा तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ४० अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, अग्निशमन दलाने फायर कॉल जरी केला आहे. जवळपास ४०० हून अधिक नागरिकांची अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली आहे.
मुंबई सेंट्रल येथे सिटी सेंटर मॉलला लागलेली भीषण आग विझवण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत. गेल्या १२ तासांपासून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मुंबई सेंट्रल बस स्थानकाजवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला काल रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी आग लागली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पहाटे दोनच्या सुमारास अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल स्तराची घोषणा करण्यात आली आहे
जवळपास १२ तासांपासून ही आग धुमसत आहे. एका मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकली आणि ती मॉलमध्ये पसरल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही आग लागली. रात्री उशिरा आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४० घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे २५० जवान घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन जवान जखमी झाले आहेत. आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत.
मुंबईतील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये ही आग लागली. रात्री मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकलं आणि आगीचे लोळ उठले. या आगीमुळे कोटींचं नुकसान झालं आहे. संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल आला असून गेल्या १२ तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दरम्यान सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव्ह या ५५ मजली इमारतीमधील जवळपास ३५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच असलेल्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे.l
.

