कोविडच्या संकटात सामान्य माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहा -विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
आरोग्यउत्सव राबविणाऱ्या सिध्दिविनायक मंडळाचे कौतुक
मुंबई: महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट गडद होत असून पुढील तीन ते चार महिने हे संकट राहण्याची शक्यता आहे. या संकटकाळात सामान्य माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहा व त्यांना शक्य ती मदत करुन या संकटावर मात करा, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज केले.
दहिसर येथील सिध्दिविनायक मंडळाने यंदा गणेशउत्सवाचे रुंपातर दहा दिवसीय आरोग्य उत्सवात केले. दहा दिवस दहा वेगवेगळ्या रोगांचे निदान करणारी आरोग्य शिबिरे दहिसर येथील ओवरीपाडा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये रोज सुमारे २५० नागरिकांची तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिरात सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी या आरोग्य रक्षकांचा सन्मान आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सामान्य माणसाला सेवा-शुश्रूषा पुरविणाऱ्या डॉक्टर व वैदयकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले, त्यांना धन्यवाद दिले. तसेच आरोग्य उत्सव राबवून जनसेवा केल्याबद्दल सिद्धिविनायक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही त्यांनी कौतुक केले.
यावेळी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचाही कोविड योध्दा म्हणून मंडळाच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार सुनील राणे, मुंबई हाऊसिंग फेडरेशन अध्यक्ष, कार्यक्रमाचे आयोजक व माजी नगरसेवक प्रकाश दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना योध्दा होऊन भाजप कार्यकर्ते शक्य ती मदत सामान्य नागरिकांना पुरवित आहेत, असे सांगताना फडणवीस यांनी राज्यातील भाजप नेते सातत्याने सामान्य माणसांच्या मदतीसाठी अविरत कार्यरत आहेत. कोविडच्या संकटात प्रविण दरेकर हे सुद्धा माझ्यासोबत राज्यभर फिरले. तसेच कोणाला रुग्णालयात बेड मिळत नसेल, व्हेंटिलेटर नसेल वा अन्य सुविधा उपलब्ध नसतील तिथे भाजपचे नेते, कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला. कोरोना योध्दाप्रमाणे काम करतानाच त्यातील ४० जणांना कोरोनाची लागणही झाली आणि ते शहिद झाले, असेही फडणवीस यांनी सांगितले.
विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, फडणवीस यांचे मी आभार व्यक्त करतो. आरोग्य उत्सवामध्ये १० दिवस सेवा करणा-या आरोग्य रक्षकांचा सन्मान करण्यासाठी व सिध्दीविनायक मंडळाच्या पदाधिका-यांच्या कार्यासाठी ते आपल्यामध्ये उपस्थित राहिले व त्यांना ख-या अर्थाने प्रोत्साहन दिले. आपले आशिर्वाद व प्रेरणा हीच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची ताकद आहे. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


