गेवराई ( बीड) दि 25——– मुख्यमंत्री महोदय , आमच्या शिवस्वराज्य यात्रेला नाव ठेवत आहेत . म्हणतात ही भ्रष्टाचार यात्रा आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला मी पाच दिवसांपासून आव्हान देत आहे की एका मंचावर या तुमच्या मंत्र्यांचे मी पुराव्यानिशी भ्रष्टाचार मांडतो. त्या मंत्र्यांवर कारवाई करण्याची तुमच्यात हिंमत आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवसुराज्य यात्रेच्या सातव्या दिवशीच्या पहिल्या गेवराई येथील सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने खोटीनाटी माहिती राज्याला देत आहे. मुख्यमंत्र्यांचं गाजर माहीत होतं परंतु आता इथे आमदाराचे लिंबू हा नवीन प्रकार ऐकायला मिळाला. मग आता गाजर आणि लिंबू गाडीला बांधायला तर हवेच ना? अशी खिल्ली त्यांनी उडवली.
राज्याचे मंत्री विनोद तावडे यांनी भ्रष्टाचाऱ्यांनी भगव्याला हात लावू नका या केलेल्या टीकेला उत्तर देतांना तावडेजी, तुम्ही तर महापुरुषांच्या फोटोंमध्येही भ्रष्टाचार केला आहे. महापुरुषांना हात लावायची तुमची पात्रता नाही अशा शब्दात प्रतिउत्तर दिले.
बीडच्या पालकमंत्र्यांनी गेवराई तालुका अशा व्यक्तीच्या दावणीला बांधला आहे की त्याला गेवराईच्या विकासाबाबत काही देणंघेणं नाही. गेवराईचे आमदार उठतात कधी ते माहिती नाही, कुठे असतात ते माहिती नाही आणि विजयसिंह राजे पंडित रोज प्रत्येकाच्या दारात असतात. त्यांना काय हवं काय नको ते बघतात.
पंडित कुटुंबाने गेवराईच्या जनतेसाठी खुप काही केले. इथल्या जनतेसाठी कारखाना चालू व्हावा यासाठी अमरसिंह पंडित यांच्या डोळ्यात आलेले पाणी मी पाहिले आहे. त्यामुळे विजयसिंह राजे पंडित यांना निवडून द्या. त्यांच्या विजयाने माझा परळीच्या विजया इतकाच आनंद द्विगुणीत होईल असे ते म्हणाले.
धनंजय मुंडे बोलत असताना सभेतून अनेक तरुण आम्हाला नोकर्या नाहीत ओरडून सांगत होते. पोर्टल बंद करा, पोलीस भरती दोन वर्ष झाली नाही या वेदना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे मांडतांना दिसत होते. त्यावेळी मी ओरडून ओरडून सांगतोय यांना निवडून देवू नका नाहीतर पुन्हा त्याच खाईत लोटले जाल असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, सौ. रुपालीताई चाकणकर, माजी आमदार अमरसिंह पंडित, राजनमामा पाटील, उषाताई दराडे, राजेंद्र जगताप, बजरंग सोनवणे, शेख महेबुब, विजयराजे पंडित, हेमाताई पिंपळे, सूरज चव्हाण, रेखाताई फड व पदाधिकारी उपस्थित होते.
