बंगालच्या उपसागरात निर्माण होते आहे वादळाची स्थिती
पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यातील हवेच्या प्रवाहांचे रूपांतर वादळात होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वादळ निर्माण होते पण प्रत्येक कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वादळ निर्माण होत नाही. कमी दाबाच्या क्षेत्रात नंतर होणाऱ्या बदलांमुळे वादळ निर्माण होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यात सध्या वादळाला पोषक बदल होत आहेत, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

दरम्यान,रविवारी मान्सूनने तामिळनाडूचा बहुतांशी भागात, अंतर्गत कर्नाटकचा काही भागात आणि आंध्र प्रदेशाच्या रायलसीमा भागात प्रगती केल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गुरूवारी मान्सूनने पश्चिम किनारपट्टीवर पुढे सरकत संपूर्ण केरळ व्यापला. त्यानंतर कर्नाटकच्या संपूर्ण किनारपट्टीवरून मान्सूनचे वारे गोव्याच्या सीमेवर पोहचले आहेत.
बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे क्षेत्र पोषक ठरून मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. कोकणानंतर मान्सून वेगाने महाराष्ट्रात पसरेल.

