‘मराठा आरक्षणाला स्थगिती; मराठा संघटनांनी पुन्हा राज्यभर आंदोलन सुरू केले
अजित पवारांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा वाजवणार ढोल!
बारामती: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शनिवार, २६ सप्टेंबरला सकाळी ९ ते ११ मराठा क्रांती मोर्चा बारामती येथे अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानासमोर ढोल वाजवणार आहे. याआधी ९ ऑगस्ट २०१८ ला मराठा क्रांती मोर्च्याने आरक्षणासाठी शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर ढोल वाजवले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील भिगवण रस्त्यावरील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानासमोर शनिवारी बारामती शहर व बारामती तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांकडून ढोल वाजवून आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन करताना पोलिस प्रशासनाचे नियम, कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा तसेच वेळोवेळी सॅनेटायझरचा वापर करणे या बाबी पाळणे बंधनकारक असणार आहे. मराठा समाजावर अन्याय होतो आहे, तरीही आपण कायदा व सुव्यवस्था त्याचसोबत स्वताःची व सामाजिक स्वास्थ्याची जबाबदारी घेत हे आंदोलन करायचे असल्याचे या बाबतच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
‘मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा संघटनांनी पुन्हा राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. ही स्थगिती उठेपर्यंत कोणतीही शासकीय भरती करू नये; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्च्याने दिला आहे. कोरोनाच्या साथीमुळे आंदोलनात सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे. समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था पाळण्याबरोबरच स्वत:ची व सामाजिक स्वास्थ्याची काळजी घेत आंदोलन करण्यात येणार आहे, असे मराठा क्रांती मोर्च्याने म्हटले आहे.