ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा
ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम आणि जर्मनीचा अॅलेक्झांडर झ्वेरेव्ह यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी संघर्षपूर्ण सलामी नोंदवली. त्याशिवाय अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच, स्टॅनिस्लास वॉवरिंका यांनी पुरुषांमध्ये, तर सेरेना विल्यम्स, सिमोना हॅलेप यांनी महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली.
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात तिसऱ्या मानांकित थीमने कझाकस्तानच्या मिखाईल कुकुश्कीनला ७-६ (७-२), ६-२, ६-३ असे तीन सेटमध्ये पराभूत केले. परंतु या विजयासाठी अमेरिकन स्पर्धेच्या विजेत्या थीमला दोन तास आणि ४० मिनिटे घाम गाळावा लागला. दुसऱ्या फेरीत थीमचा डॉमिनिक कोपफरशी सामना होईल. सहाव्या मानांकित झ्वेरेव्हने अमेरिकेच्या मार्कस गिरोनवर ६-७ (८-१०), ७-६ (७-५), ६-३, ६-२ अशी पिछाडीवरून सरशी साधली. तीन तास आणि १२ मिनिटे रंगलेल्या या लढतीदरम्यान झ्वेरेव्हने रागाच्या भरात दोन वेळा स्वत:ची रॅकेटदेखील कोर्टवर आदळली. बुधवारी दुसऱ्या फेरीत झ्वेरेव्हची मॅक्सिम क्रीजीशी गाठ पडणार आहे.
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या सर्बियाच्या जोकोव्हिचने फ्रान्सच्या जेरेमी चॅर्डीचा ६-३, ६-१, ६-२ असा धुव्वा उडवला. जोकोव्हिचला पुढील लढतीत फ्रान्सेस टिआफोएचा सामना करायचा आहे. स्वित्झर्लंडच्या १७व्या मानांकित वॉवरिंकाने प्रेडो सौसावर ६-३, ६-२, ६-४ असा विजय मिळवला. जपानच्या केई निशिकोरीला मात्र स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाने ७-५, ७-६ (७-४), ६-२ असे नमवून त्याचे आव्हान संपुष्टात आणले.
महिला एकेरीत रॉड लेव्हर एरिनामध्ये झालेल्या सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या ३९ वर्षीय सेरेनाने लॉरा सिगमंडला ६-१, ६-१ अशी अवघ्या ५६ मिनिटांत धूळ चारली. मार्गारेट कोर्ट यांच्या २४ ग्रँडस्लॅम जेतेपदांची बरोबरी साधण्याची संधी असलेल्या सेरेनापुढे दुसऱ्या फेरीत निना स्टॅनकोव्हिचचे आव्हान असेल. जपानच्या तिसऱ्या मानांकित नाओमी ओसाकाने अनास्ताशिया पावल्यूचेनकोव्हाचा ६-१, ६-२ असा पराभव केला. रोमानियाच्या दुसऱ्या मानांकित हॅलेपने लिझेट कॅबेरावर ६-२, ६-१ असे वर्चस्व मिळवले. जर्मनीच्या २३व्या मानांकित अँजेलिक कर्बरला मात्र बेनार्डा पेराने ६-०, ६-४ असे नमवले.
