Congressठाणेठाणे महानगरपालिकामहानगरपालिका
ठाणे महापालिकेविरोधातील आंग्रेंचे आंदोलन अधिकृतच!
ठाणे, दि. २७ (प्रतिनिधी) : घोटाळेसम्राट महापालिका व आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात कॉंग्रेस नेते रविंद्रनाथ आंग्रे यांच्याकडून करण्यात येणारे आंदोलन अधिकृतच आहे. या आंदोलनाला प्रदेश कॉंग्रेसचा पाठिंबा आहे, असे कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी पत्रकान्वये स्पष्ट केले आहे. रविंद्रनाथ आंग्रे यांचे आंदोलन वैयक्तीक असल्याचा शहर कॉंग्रेसकडून करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचे पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केले. त्याचबरोबर २८ ऑगस्टचा भव्य मोर्चा व २बेमुदत साखळी उपोषणात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हिरीरीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या पाच वर्षांत ठाणे महापालिकेमध्ये विविध खात्यामधील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे वृत्तपत्रांतून बाहेर आली. कोट्यवधींचा टीडीआर व बांधकाम टीडीआर घोटाळा, वर्तकनगर म्हाडा पुनर्विकास घोटाळा, शिक्षण खात्यातील घोटाळा, रस्ते बांधणीतील भ्रष्टाचार, घनकचरा विभागातील घोळ, बीएसयूपीच्या घरे वाटपातील घोटाळा, नालेसफाई घोटाळा, काही मोठे बिल्डर व अधिकाऱ्यांनी संगनमत करुन अनधिकृतपणे व नियम तोडून केलेल्या बांधकामातील भ्रष्टाचार, वृक्षलागवड व संवर्धन या प्रकल्पातील गैरव्यवहार आदींच्या चौकशीच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे नेते रविंद्रनाथ आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून लढा दिला जात आहे.
या प्रकरणी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांची सीआयडी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी व कारवाई करण्याच्या मागणीसाठी उद्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर गुरुवारपासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. या मोर्चाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कॉंग्रेसचे कोकण प्रभारी बी. एम. संदीप व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, उपाध्यक्ष सुभाष कानडे, नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, ठाणे शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षांना विश्वासात न घेता आंदोलन करण्यात येत असल्याचा आरोप करुन कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन करण्यात येत होते. या प्रकरणाची प्रदेश कॉंग्रेसने तातडीने दखल घेऊन रविंद्रनाथ आंग्रे यांच्याकडून केले जाणारे आंदोलन अधिकृतच असल्याचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

