मुंबई

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर सापडली स्फोटकांनी भरलेली जीप!

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि भारतातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे.

बुधवारी मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे. अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचं समोर आलं आहे. तर आज दुपारी तीन वाजता या कारसंदर्भातील फोन आल्याचं कळतं. कारमध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्रालयाला संबंधित प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्रालयालाही याबाबत कळवण्यात आलं आहे. आता राज्य आणि केंद्रीय यंत्रणा या प्रकरणी तपास करणार असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र सरकारने मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाची विचारपूस करुन सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं.

जिलेटीनच्या कांड्यांचा वापर स्फोटकं म्हणून केला जातो. विशेषत: खाणकाम, विहिरी खणणं, मोठमोठे दगड फोडणे किंवा दगड खाणींमध्ये जिलेटीनचा वापर केला जातो. लांबून वात पेटवून स्फोट घडवून, या दगड फोडण्यासाठी विशेषत: जिलेटीनचा वापर केला जातो. मात्र जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट होऊन अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या यापूर्वी अनेकवेळा आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकातील दगडखाणीत स्फोट होऊन जागेवर 5 कामगारांचा मृत्यू झाला होता.

एका जिलेटीनच्या कांडीत भीषण स्फोटाची क्षमता असते. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ तर 20 जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. त्यामुळे या कांड्यांची तीव्रता किती असू शकते याचा अंदाज येऊ शकतो.

‘मला या प्रकरणाची माहिती आताच मिळाली आहे. मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास गुन्हे शाखा करत आहे. लवकरच सत्य समोर येईल’, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button