महानगरपालिकामुंबई

मुंबईकरांनो लक्ष द्या! BLO तुमच्या घरी येणार, मतदार यादीसाठी ही कागदपत्रे ठेवा तयार

मुंबई महानगरपालिकेने (BMC) विशेष गहन पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) 2026 अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. या मोहिमेअंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरभेटी देणार असून मतदारांची माहिती पडताळून घेणार आहेत. नागरिकांनी आवश्यक माहिती भरून फॉर्म सादर करावा तसेच घरभेटीदरम्यान आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

30 जून ते 29 जुलैदरम्यान BLO कडून घरभेटी

विशेष मतदार यादी पुनरावलोकन कार्यक्रमांतर्गत BLO नागरिकांच्या घरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. यावेळी मतदारांनी दिलेला फॉर्म भरून त्यावर स्वाक्षरी करून त्याची प्रत BLO कडे जमा करावी लागणार आहे.

आधीच तपासा मतदार यादीतील नाव

प्रशासनाने नागरिकांना घरभेटीपूर्वी मागील विशेष पुनरावलोकनातील (SIR) मतदार यादीत स्वतःचे किंवा पालकांचे नाव तपासण्याचे आवाहन केले आहे. मतदारांना नाव, मतदारसंघ, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक यासंबंधी माहिती अधिकृत मतदार सेवा पोर्टल किंवा हेल्पलाइन अ‍ॅपवरून मिळू शकते.

🔹Under the Special Intensive Revision (SIR) Programme of the Electoral Rolls – 2026, Booth Level Officers (BLOs) will conduct door-to-door visits from 30th June to 29th July 2026.
🔹It is appeal to all citizens to extend their cooperation by providing the necessary information… pic.twitter.com/tHPKVWUFG9— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 12, 2026

पासपोर्ट आकाराचा फोटो ठेवावा तयार

मतदार पडताळणी प्रक्रियेसाठी नागरिकांनी अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो तयार ठेवावा. यामुळे पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.

कोणती कागदपत्रे लागणार?

मतदार यादीत नाव नसल्यास किंवा नवीन नोंदणीसाठी जन्मदाखला, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, सरकारी ओळखपत्र, पेन्शन आदेश, शेतकरी ओळखपत्र, आधार कार्ड यांसारखी कागदपत्रे सादर करावी लागू शकतात. नागरिकांनी यापैकी किमान एक किंवा अधिक कागदपत्रे तयार ठेवावीत.

अपात्र मतदारांना स्थान नाही

या मोहिमेचा उद्देश पात्र मतदारांची नावे यादीत कायम ठेवणे आणि अपात्र व्यक्तींची नावे वगळणे हा आहे. त्यामुळे नागरिकांनी BLO यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Back to top button