आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी स्टार स्प्रिंटर हिमा दासला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. आपले बालपणीचे स्वप्न साकार होत असल्याचे या प्रसंगी हिमाने सांगितले. माजी केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल यांनी हिमा दासला नियुक्ती पत्र दिले. राज्य शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलिस महासंचालकांसह, पोलिस विभागातील इतर अधिकारीही समारंभाला उपस्थित होते.डीएसपी म्हणून पदभार घेतल्यानंतर झालेल्या समारंभाला संबोधित करताना २१ वर्षीय हिमाने सांगितले की, तिने लहान असताना पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते.
“इथल्या लोकांना माहित आहे आणि मी काही वेगळे बोलणार नाही. माझ्या शाळेच्या सुरुवातीच्या काळापासून, मी एक दिवस पोलिस अधिकारी बनण्याची इच्छा बाळगली होती आणि माझ्या आईची पण हीच इच्छा होती. “माझी आई दुर्गापूजेच्या वेळी खेळण्यातली एक बंदूक खरेदी करायची, मला आसाम पोलिसांसाठी काम करण्यास सांगायची, लोकांची सेवा करून एक चांगली व्यक्ती होण्यासाठी सांगायची.”
हिमाने आयएएएफच्या वर्ल्ड अंडर २०च्या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय धावपटू आहे. हिमाच्या नावावर ४०० मीटर स्पर्धेचा राष्ट्रीय विक्रम देखील आहे.पोलिस दलात दाखल झालो असलो तरी हिमाने धावपटू म्हणून करिअर सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. हिमाने २०१८च्या आशियाई स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याच बरोबर महिलांच्या ४०० मीटर रिलेच्या विजेत्या संघात ती होती.
