Sportsक्रीडा

भारताच्या अंकिता रैनाची गरुडभरारी

ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरणारी पाचवी महिला टेनिसपटू

भारताच्या अंकिता रैनाला कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीमध्ये अंकिता रोमानियाच्या मिहेला बुझार्नेकूसह खेळणार असून या दोघींना थेट मुख्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. भारताकडून ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळणारी अंकिता पाचवी महिला खेळाडू ठरली आहे.

‘‘माझ्या एका मैत्रिणीने मिहेला महिला दुहेरीसाठी सहकारी शोधत असल्याचे सांगितले. त्यामुळे मी त्वरित मिहेलाशी संवाद साधला आणि दोघींनीही एकत्रित खेळण्याचे ठरवले. यापूर्वी मी कधीही मिहेलासह खेळली नसली तरी डावखुऱ्या खेळाडूंसह खेळण्याचा मला अनुभव आहे. त्यामुळे मिहेलासह खेळण्यासाठी मी आतुर आहे,’’ असे अंकिता म्हणाली. अंकिता आणि मिहेला यांच्यापुढे पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ओलिव्हिया गॅडेकी आणि बेलिंडा वूलकॉक यांचे आव्हान असून बुधवारी ही लढत होणार आहे.

पुण्यात स्थायिक असलेल्या २८ वर्षीय अंकिताला महिला एकेरीच्या मुख्य फेरीत नशिबाच्या बळावर प्रवेश मिळवण्याची संधी आहे. पहिली फेरी संपेपर्यंत एखाद्या खेळाडूने कोणत्याही कारणास्तव माघार घेतली, तर अंकिताला एकेरीतही खेळता येईल. परंतु स्पर्धेसाठी अवघा एक दिवस शिल्लक असतानाच तिने बुझानेकूसह दुहेरीत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिला ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणारी पाचवी महिला टेनिसपटू ठरण्याचा मान मिळाला. यापूर्वी निरुपमा मंकड, निरुपमा वैद्यनाथन, सानिया मिर्झा आणि शिखा उबेरॉय या चौघींनी भारताकडून ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा पराक्रम केला आहे.

अंकिताव्यतिरिक्त पुरुष एकेरीत सुमित नागल आणि दुहेरीत रोहन बोपण्णा आणि दिविज शरण हे अनुभवी भारतीय खेळाडू खेळताना दिसतील. नागलची सलामी लढत लिथुनियाच्या रिकार्डस बोरान्किसशी होणार आहे. शरण स्लोव्हाकियाच्या इगोर झेलेनायसह खेळणार असून त्यांच्यापुढे पहिल्या फेरीत जर्मनीच्या केव्हिन क्रॉवेट आणि यानिक हँफन या जोडीचे आव्हान असेल. बोपण्णा जपानच्या बेन मॅकलाचलनसह खेळणार असून या जोडीची पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाच्या नाम जी संग आणि मिन क्यू साँग या जोडीशी गाठ पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button