विनामास्क फिरणाऱ्यावर महापालिकेची गांधीगिरी
कोल्हापूर : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री या उपक्रमांतर्गत मास्क नसलेल्या नागरीकांना महानगरपालिकेच्यावतीने आणि चेंबर ऑफ कॉमर्स तसेच विविध व्यापारी असोशिएशनच्या सहकार्याने मोफत मास्क आणि गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पध्दतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यापुढे कायम मास्क लावण्याचा सल्लाही देण्यात आला.
अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावरुन फिरतांना आढळतात, या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि चेंबर ऑफ कॉमर्स, महाव्दाररोड व्यापारी असोशिएशन, कापड व्यापारी संघ अशा शहरातील विविध व्यापारी असोसिएशन व संघटनांच्या सहकार्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर आज दंडात्मक कारवाई न करता त्यांची गांधीगिरी पध्दतीने मास्क आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
बिनखांबी गणेश मंदीर परिसरात महापालिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांच्या हस्ते आणि नगरसेवक तौफिक मुलानी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सहाय्यक आयुक्त संदिप घार्गे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते विनामास्क फिरणाऱ्यांना मोफत मास्क आणि गुलाबपुष्प या गांधीगिरीमुळे शहरात सर्वजण या पुढील काळात मास्क वापरुन महापालिका प्रशासनास सहकार्य करतील अशी अपेक्षा अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.