नाना पटोले यांनी स्वीकारला प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार !
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दुपारी १ वाजता प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. या वेळी सुशीलकुमार शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते. नाना पटोले यांच्यासह नवनियुक्त कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनीही पदभार स्विकारला आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रॅली काढली. मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानपर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान नाना पटोले यांनी ट्रॅक्टर चालवत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. तसेच, “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानादेखील १०० रुपयांपर्यंत दर गेले आहेत. देशातील जनतेची लूट सुरु आहे तसंच महागाई त्याविरोधातही आम्हाला संदेश द्यायचा आहे,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
माजी प्रांताध्यक्ष, विधी मंडळ कॉंग्रेसचे नेते तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली आहेत. ‘राज्यात कॉंग्रेसचा सगळ्यात मोठा पक्ष बनवणार. एक नंबरचा पक्ष बनवणार’ अशी घोषणा नाना पटोले यांनी दिली.