प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ ; धक्कादायक माहितीसमोर
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार त्यांना ईडी कोठडी अहवाल केला आहे. या अहवालात ईडीने थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले असून प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी कोठडी अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहे.
MMRDA मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा ईडीने न्यायालयासमोर केला आहे. अमित चंडोळे याला अटक केल्यानंतर त्याची ईडी कोठडी मिळावी याकरिता ईडीने त्यांच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ईडीने न्यायालयात सादर केलेल्या कोठडी अहवालात थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले आहे. ईडीच्या सहायक संचालक अर्चना सलाये यांनी हा ईडी कोठडी अहवाल न्यायालयात सादर केला आहे.
MMRDA सुरक्षा रक्षक कंत्राटामधील ३० टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील ५० टक्के हिस्सा अमित चंडोळे घ्यायचा. हा ५० टक्के हिस्सा प्रताप सरनाईकांचा आहे, असे टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्स ग्रुपचे मालक राहुल नंदा यांनी सांगितले होते. मुंबईतील सर्व उड्डाण पुलांवर सुरक्षा रक्षक आणि ट्रॅफिक मार्शल पुरवण्याचे MMRDA चे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळाले होते, ज्याकरिता महिना ३२ ते ३३ लाख रुपये MMRDA देणार होती.
हे कंत्राट ५०-५० टक्के प्रॉफिट शेअरनुसार टॉप्स ग्रुप आणि प्रताप सरनाईक यांच्यात ठरलं होतं. हा प्रताप सरनाईकांचा ५० टक्के शेअर टॉप्स ग्रुपकडून प्रताप सरनाईक यांच्याकरिता अमित चंडोळे रोख रकमेत स्वीकारायचा. अमित चंडोलेला टॉप्स ग्रुप दरमहिना सहा लाख रुपये बिझनेस प्रमोशनकरिता देत असल्याची नोंद आधी करण्यात आली होती. ती नोंद नंतर अमित चंडोळेला दरमाह टॉप्स ग्रुपकडून सहा लाख रुपये पगार म्हणून दाखवण्यात आली. उद्योगपती राहुल नंदा यांची आणि अमित चंडोळेची भेट प्रताप सरनाईक यांनी घडवून आणली होती.
MMRDA आणि टॉप्स ग्रुपमध्ये जे व्यवहार व्हायचे त्या व्यवहारातील ५० टक्के रक्कम ही राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांच्यात ठरलेल्या करारानुसार, अटी-शर्तीपलीकडे जाऊन दिली जायची. ती रक्कम रोख स्वरूपात किंवा इंटरनेट बॅंकिंग स्वरूपात दिली जायची. MMRDA चे सुरक्षा रक्षकांचे टेंडर निघण्यापूर्वी ५० टक्के नफा या टेंडरमधून प्रताप सरनाईकांना दिला जाईल, असे सगळे व्यवहार तोंडी स्वरूपात एकमेकांशी झाले होते, असे आरोप अहवालात करण्यात आले.