आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर- पाटण व आहुपे खोर्यामध्ये गेल्या आठ दहा दिवसांपासुन सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने कुशिरे भोईरवाडी रस्त्यावर असणार्या घाटामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या असून काही ठिकाणी रस्ता वाहुन गेला. यामुळेच भीमाशंकर-पाटण खोर्याचा आहुपे खोर्याशी संपर्क तुटला आहे.
चालु वर्षी हा घाट रस्ता नव्याने दुरुस्त करण्यात आला परंतु आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग हा अत्यंत दुर्गम भाग असल्यामुळे या भागामध्ये करण्यात येणारी कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची व जिवावर आल्यासारखी केली जात आहेत. प्रशासनाने आदिवासी जनतेची दखल घेत तात्काळ ह्या घाटाची दुरुस्ती करावी अशी मागणी कुशिरे भोईरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दिगंबर भोईर माजी उपसरपंच दिलीप मुद्गुण यांनी केली.

