पीएम फंडातून दिलेले ४०० व्हेंटिलेटर्स धुळखात पडून! ; भाजपचा आरोप
मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएम केअर फंडमधून मुंबई महापालिकेला ४०० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु हे सर्व व्हेंटिलेटर्स महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये धुळखात पडून असल्याचा गौप्यस्फोट महापालिकेतील भाजप पक्षाने केला आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून मुंबईत व्हेंटीलेटर्स अभावी रुग्ण तडफडून मरत आहेत. महापालिकेच्या विविध रुग्णालयांसह खासगी रुग्णालय आणि उपचार केंद्रांमध्ये खाटाही उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत होता. परंतु आता रुग्णालय आणि उपचार केंद्रात खाटांची सुविधा असली तरी व्हेंटीलेटर्सची सुविधा मात्र नाही. महापालिकेने कोविड उपचार केंद्रातील अनेक खाटा ऑक्सिजन रुपांतरीत केल्या आहेत.
परंतु ऑक्सिजनची सुविधा असली तरी ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या आणि चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांना व्हेंटीलेटर्सची सेवा आवश्यक असते. परंतु सध्या व्हेंटीलेटर्स अभावी मोठ्या समस्येला मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला रुग्णालय आणि कोविड उपचार केंद्रांमध्ये व्हेंटीलेटर्सची सुविधा नसतानाच दुसरीकडे पंतप्रधान केअर फंडातून महापालिकेला ४०० व्हेंटीलेटर्स दिले असून हे सर्व व्हेंटीलेटर्स धुळखात पडले असल्याचा आरोप भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

