BJPMaharashtra GovShivSenaपुणे

भाजप नेत्यांनाही विश्वासात घेऊ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पुणे :  पुण्यात कोरोनाचे वाढत असलेले रुग्ण चिंता व्यक्त करणारे आहेत. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याची ओरड विरोधकांकडून होत होती. त्यामुळे शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुद्द लक्ष घातले असून त्यांची आज पुण्यात येऊन विभागीय आयुक्तालयात कोरोनासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यात जम्बो रुग्णालय कुठे उभारले जाणार, कुठे किती प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली.

यावेळी भाजपच्या नेत्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. केंद्रीय पथक आणि इतर बैठकांमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप भाजपने केला. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या एक लाखावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे राज्य सरकारने पुण्यात जास्त लक्ष घालावे अशी, अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. तसेच कुठलेही निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, बैठकांची माहिती दिली जात नाही, अशी ओरडही होत होती. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली.

तसेच यापुढे असे प्रकार होणार नसल्याची ग्वाही दिली. प्रत्येक वॉर्डमध्ये कोविड दक्षता समिती स्थापन करावी, केंद्राकडून काही वैद्यकीय सवलत सप्टेंबरपासून बंद होणार आहे, ती पुन्हा मिळत राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

लॉकडाऊन हा पर्याय नाही, नागरिकांनी नियम पाळले पाहिजेत, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यासारखे लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button