अर्जुन तेंडुलकरने नुकतीच आपल्या क्रिकेट करिअरला सुरुवात केली असली तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने तो नेहमीच चर्चेत असतो. सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने सर्वांचीच नजर अर्जुन तेंडुलकरवर आहे. पण अर्जुन वडिलांप्रमाणे फलंदाज नसून वेगवान गोलंदाज असून स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरचं नाव आयपीएलच्या लिलावात आलं तेव्हाच मुंबई इंडियन्स त्याच्यावर बोली लावणार असा अंदाज वर्तवला जात होता. त्याप्रमाणे मुंबई इंडियन्सले २० लाखांच्या मूळ किंमतीत अर्जुन तेंडुलकरला संघात घेतलं आहे.
अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने संघात घेण्यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून काहीजणांनी नेपोटिझमचा उल्लेख केला आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धेनेकडून अर्जुन तेंडुलकरला विकत घेण्यामागील कारण सांगण्यात आलं आहे. अर्जुन तेंडुलकरला फक्त आणि फक्त त्याच्या गुणवत्तेच्या आधारे विकत घेतलं असल्याचं त्याने म्हटलं आहे.
मुंबई इंडियन्ससोबत खेळणं अर्जुनसाठी एक शिकण्याची प्रक्रिया असेल असा विश्वास महेला जयवर्धेनेने व्यक्त केला आहे. २१ वर्षीय अर्जुनला शिकण्याची आणि आपल्या वेळेसोबत खेळ सुधारण्याची संधी असल्याचंही त्याने सांगितंल आहे.जयवर्धनेने हेही स्पष्ट केले की, अर्जुन तेंडुलकरच्या डोक्यावर एक मोठा टॅग लागणार आहे. सचिन तेंडुलकर असल्यामुळे तो गोलंदाज आहे, फलंदाज नाही. अर्जुनला शिकण्याची ही मोठी संधी आहे. तो अजूनही तरुण आहे.
मुंबई इंडियन्सचे डायरेक्टर झहीर खान म्हणाले की, ‘अर्जुन तेंडुलकर खूप मेहनती आहे, त्याला खूप काही शिकायचं आहे, ही सर्वात रोमांचक गोष्ट आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा होण्याचा अतिरिक्त दबाव त्याच्यावर कायमच राहतो, हे असेच आहे. यावातावरणात त्याला वावरावे लागणार आहे. संघाचे वातावरण त्याला मदत करेल.
गेल्या दोन ते तीन हंगामात अर्जुन तेंडुलकर नेट बॉलरची भूमिका साकारत होता. 21वर्षीय अर्जुनने नुकताच हरियाणाविरूद्ध सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले.
