संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा; इंडियन मेडिकल असोसिएशनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं असे विधान केले होते . त्याच्या विधानाचा इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निषेध करण्यात आला आहे .
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवण्यात आले आहे. राऊतांनी राजीनामा द्यावा ,अशी मागणी करण्यात आली आहे . राऊत यांच्या वक्तव्यामुळे डॉक्टरांचे खच्चीकरण झाले असून त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे पत्र :
संपूर्ण जग सध्या करोना संकटाचा सामना करत आहे याची तुम्हाला जाणीव आहेच. आरोग्य कर्मचारी फक्त आपला स्वत:चा नाही तर त्यांच्यावर अवलंबून असणारी मुलं, जोडीदार, आई-वडील यांचाही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत सरकार आणि राजकारण्यांनी आमच्या बाजूने उभं राहावं अशी अपेक्षा आहे.
संजय राऊत यांनी कंपाऊंडरला डॉक्टरपेक्षा जास्त कळतं असे म्हटल्याने आम्ही अस्वस्थ आहोत. आम्ही त्यांच्या या वागण्याचा निषेध करत असून राजीनाम्याची मागणी करतो. अशा नकारात्मक आणि अपमानजनक वक्तव्यामुळे आम्ही डॉक्टर पूर्ण कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणे काम करु शकत नाही आहोत. सर्व डॉक्टरांच मनोधैर्य खच्चीकरण झालं असून तुम्ही योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा आहे.

