Maharashtra GovPoliticsमुंबई

“महाविकासआघाडीचं लवकरच विसर्जन होणार” म्हणणाऱ्या आठवले-राणेंवर फडणवीस संतापले !

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याच पक्ष आणि मित्रपक्षातील नेतेमंडळींवर चांगलेच संतापल्याचे दिसून आले आहे. “महाविकास आघाडीचं लवकरच विसर्जन होणार”, “देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार”, असे दावे अगदी सातत्याने भाजपमधील नेत्यांकडे केले जातात. याच नेत्यांना आता फडणवीसांनी घरचा आहेर दिला आहे. “फडणवीस लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होणार” असे भाकीत खासदार गोपाळ शेट्टी यांनी नुकतेच केले. त्यामुळे, “सत्ता विसर्जनाचा मुहूर्त नेमका कधी काढायचा हे अशी वक्तव्य करणाऱ्यांशी चर्चा करूनच ठरवणार”, असा बोचरा टोला देवेंद्र फडणवीस आपल्याच नेत्यांना लगावला आहे. यापूर्वी भाजप खासदार नारायण राणे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील अशा प्रकारची वक्तव्ये केली आहे. 

“वेगवेगळी भाकितं करणाऱ्यांच्या मनातला सत्ता विसर्जनाचा मुहूर्त विचारुन घेईन”, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. “सध्या आमच्यासाठी केवळ कोरोना विरुद्धच्या लढाई महत्वाची आहे. सत्तेत येणं हा गौण भाग आहे”, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी भाजपविषयी सरकार पाडण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. दहिसरमधील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्य महोत्सवात फडणवीस बोलत होते. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना गदा भेट दिल्यानंतर बोलतानाही देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान केले आहे. “मी याचा प्रहार हा फक्त कोरोनाच्या लढाईसाठी करणार आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.
 
देवेंद्र फडणवीसांनी यावेळी अन्य काही समस्यांवर देखील भाष्य केले आहे. “आजही रुग्णांना अवाजवी बिलं आकारली जातात. बिलांचं कॅपिंगची फाईल प्रलंबित का आहे ? कोणी थांबवली ? विदर्भात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष होता काम नये. राज्य सरकारने दारुची दुकानं उघडताना दाखवली त्यापेक्षा ५० टक्के उत्साह तरी मंदिरं उघडताना दाखवला. दारुमुळे कोरोना होत नाही आणि मंदिरांमुळे होतो असं काही नाहीये”, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button