मनोरंजनलाईफस्टाईलशहर

26 अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांचे नोकरीचे `विघ्न’ दूर

ठाणे व पालघर जिल्ह्यात दहा वर्षांपासून कार्यरत 26 अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांचे `विघ्न’ दूर झाले आहे. आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाने शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना नोकरीमध्ये पूर्ववेळ कायम करण्याचा निर्णय घेतला.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये 26 अर्धवेळ प्रयोगशाळा सहायक कार्यरत आहेत. ते 2008 पासून शाळांमध्ये कार्यरत आहेत. मात्र, 2016-17 च्या संचमान्यतेनुसार अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकाच्या पदाला मंजूरी नव्हती. त्यामुळे त्यांची सेवा नियमित होत नव्हती. तर पदाला मान्यता नसल्यामुळे वेतन अधीक्षक व वेतन भविष्य निर्वाह निधी पथकाकडून बिले मंजूर केली जात नव्हती. त्यामुळे सुमारे 16 महिन्यांपासून 26 कर्मचाऱ्यांना पगारही मिळाला नव्हता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांबरोबरच कुटुंबियांचेही वेतनाअभावी हाल होत आहेत. या प्रश्नाची दखल आमदार निरंजन डावखरे यांनी घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले. तसेच प्रशासकीय पातळीवरही पाठपुरावा सुरु केला होता.
ठाणे जिल्ह्यात 27 व पालघर जिल्ह्यात 18 अशी 45 पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर 26 प्रयोगशाळा सहायकांचे समायोजन होऊ शकते, अशी शिफारस ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी केली होती. तर संबंधित शाळेत प्रयोगशाळा सहायकाची पदे एकाकी आहेत. त्यामुळे त्यावर समायोजन करता येणार असल्याचा अभिप्राय शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी दिला होता. त्यानंतर या प्रस्तावांचा आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून आग्रह धरला जात होता.
अखेर आमदार डावखरे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना नोकरीत कायम करण्याच्या प्रस्तावाला काल मंगळवारी मंजुरी दिली. या निर्णयामुळे अर्धवेळ प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांवरील दहा वर्षांपासूनचे अर्धवेळ नोकरीचे `विघ्न’ दूर झाले आहे. या संदर्भातील अध्यादेश लवकरच जारी केला जाणार आहे, असे आमदार डावखरे यांनी सांगितले. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button