‘मेड इन पीआरसी’, बहिष्कार टाळण्यासाठी चीनची बनवाबनवी
मुंबई: चीनच्याविरुद्ध भारतात उसळलेल्या संतापाच्या लाटेचा फटका आता चीनला बसू लागला आहे. अनेक दुकानदारांनीही चिनी उत्पादने विकणे बंद केले आहे. यावर चीनने बनवाबनवीचा मार्ग वापरणे सुरू केले आहे. चिनी उत्पादनांवर ‘मेड इन चायना’ ऐवजी ‘मेड इन पीआरसी’ लिहू लागला आहे. ‘मेड इन पीआरसी’ मधला ‘पीआरसी’ म्हणजे ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ म्हणजे चीन !
२०१७ ला चीनने डोकलाममध्ये केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारतात चीनच्या विरुद्ध निर्माण झालेल्या संतापानंतर चीनमध्ये उत्पादित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली होती. पण, डोकलामचा वाद जीवहानी न होता मिटला त्यामुळे ती मोहीम फार तीव्र झाली नाही पण चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकणारा देशातील जागृत वर्ग वाढला.
आता, १५ जूनला गलवानच्या खोऱ्यात झलेल्या चकमकीत भारताचे २० पेक्षा जास्त जवान शहीद झल्यानंतर भारतात पुन्हा चीनविरुद्ध संतापाची तीव्र लाट उसळली आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका चीनला बसणार असे संकेत दिसत आहेत.
दरम्यान, चीनने डोकलामनंतरच्या भारतातील चीनी उत्पादनांवरील बहिष्काराच्या मोहिमेत भारतीयांची दिशाभूल करण्यासाठी चीनच्या उत्पानांवर ‘मेड इन चायना’ ऐवजी ‘मेड इन पीआरसी’ लिहिणे सुरू केले.
याबाबतचा अनुभव सांगताना दिल्लीतील व्यापारी मुकेश कुमार यांनी एका वाहिनीला सांगितले की ‘मेड इन पीआरसी’ म्हणजे ‘मेड इन चायना’हे मलाही माहीत नव्हते ! एका ठोक व्यापाऱ्याने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून अनेक ग्राहक म्हणतात – आम्हाला चीनी सामान नको. ते ‘मेड इन चायना’ लिहिलेले उत्पादन घेत नाहीत पण ‘मेड इन पीआरसी’ घेतात. मात्र, त्यांना जेव्हा ‘मेड इन पीआरसी’ म्हणजे ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ म्हणजे चीन, असे आम्ही सांगतो तेव्हा ते ‘मेड इन पीआरसी’ घेत नाहीत.
या संदर्भात आणखी उल्लेखनीय म्हणजे चीनी उत्पादने भारतीय वाटावीत म्हणून त्यावरील चित्रांमध्ये चीन भारतीय लोकांची चित्रे वापरतो व बऱ्याच वस्तूंवर तपशील हिंदीत छापतो. चिनी उत्पादनांना भारतीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो.

