आजारी व अपंग भाविकांना देखील घेता येईल विठ्ठल – रुक्मिणीचे दर्शन
पंढरपुरात रोज हजारो तर यात्रा कालावधीत लाखो वारकरी श्री विठ्ठल – रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येतात. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रोज विठ्ठल मंदिरात जाणे प्रत्येक भाविकांना शक्य होत नाही़ तसेच यात्रेच्या गर्दीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी न येणाऱ्या भाविकांना घरबसल्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे. या हेतूने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे थेट दर्शन सुरु करण्यात आले आहे. हे थेट दर्शन दाखविण्याचे हक्क दोन कंपन्यांना देण्यात आले असून तसा करार झाला. यामुळे मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली. आजारी, अपंग या कारणाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी न येणाऱ्या भाविकांना इंटरनेटवर जिओ टीव्ही व टाटा स्कायच्या माध्यमातून विठ्ठल-रुक्मिणीमातेचे आॅनलाईन दर्शन घेता येणार आहे. तसेच मंदिर समितीला यातून सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार. यामुळे पंढरी नगरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्या उत्पन्नातून आणखी चांगल्या सोयी सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे देखील भोसले यांनी सांगितले.