मुंबईत आढळला युकेचा नवा कोरोना स्ट्रेन
मुंबई: संपूर्ण जगभरासह महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे. पुणे,नागपूर अमरावती, वर्धा, हिंगोली परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. आतापर्यंत ब्रिटनसह इतर देशांमध्ये हा नवा स्ट्रेन पसरल्याची माहिती समोर येत होती. पण आता मुंबईत हा नवीन स्ट्रेन दाखल झाल्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.
मुंबईमध्ये युकेचा नवा कोरोना स्ट्रेन आढळला असून आतापर्यंत ही रुग्णसंख्या 4वर पोहोचली आहे. 90 नमुन्यांपैकी एका व्यक्तीच्या अहवालात हा स्ट्रेन सापडला आहे. जिनोम सिक्वेन्सिंगनंतर एका रुग्णामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला. मुंबईत आतापर्यंत यूके स्ट्रेनच्या 4 केसेस झाल्या आहेत. दिल्लीच्या प्रयोग शाळेत जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेल्या 90 पैकी एका सँपलमध्ये ब्रिटनमधील कोरोनाचा नवास्ट्रेन आढळून आला आहे. आतापर्यंत संपूर्ण अहवाल आलेले नाहीत.
गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ९ हजार ८५५ कोरोना रुग्ण समोर आले असून यामुळे राज्यभरात खळबळ निर्माण झाली आहे. यामुळे ४२ लोकांना मृत्यू सामना करावा लागला आहे. सध्या राज्यात मृत्यूदर हा २.४० टक्के आहे. राज्यात ६ हजार ५५९ कोरोना रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. यामुळे कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट ९३.७७ आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेसमध्ये ८२ हजार ३४३ एक्टिव्ह रुग्ण आहेत.