पार्थ यांची मागणी सुप्रिम कोर्टानं एकप्रकारे ग्राह्य धरली – देवेंद्र फडणवीस
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी कुणी करावी यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे सत्ताधारी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यासाठी अनुकुल नव्हते. त्यातच विरोधकांच्या सुरात सूर मिसळत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचा नातू पार्थ पवार यांनीही सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागमी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती ती त्यांनी फेटाळली. त्यानंतर आजोबा शरद पवार यांनी नातू पार्थ यांच्या मताला आम्ही कवडीची किंमत देत नाही तो सध्या अपरिपक्क्व आहे असे विधान करत जाहीरपणे पार्थ यांना फटकारले होते.
त्यानंतर पवार कुटुंबातील कलह राज्याच्या समोर आला होता. त्यावर पडदा पडताच सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते! अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रतिक्रियेवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ यांनी काय ट्विट केले ते मला माहिती नाही. असे म्हणाले.
माध्यमांनी त्यांना पार्थच्य़ा प्रतिक्रियेबद्दल सांगितले असता आणि पार्थ यांच्या पक्षविरोधी भूमिकेवरून फडणवीसांना विचारले असता, मागणी आजोबांना आवडली की नाही त्यावर बोलणार नाही. पार्थ यांची मागणी सुप्रिम कोर्टानं एकप्रकारे ग्राह्य धरली. म्हणून कदाचित त्यांनी ते ट्विट केलं असावं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्य़ान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट बजावलं आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती. असेही कोर्टाने म्हटले आहे.
या प्रकरणी 11 ऑगस्टला युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर 13 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षकारांनी आपापली बाजू लेखी स्वरुपात संक्षिप्तरित्या मांडली होती. मग सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल दिला.
सुप्रीम कोर्टच्या या निकालानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे.

