EnvironmentMaharashtra Govजिल्हा परिषदमहानगरपालिका

कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत लेकींच्या नावानं लागणार २१ लाख झाडं

शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने शेतात, शेतबांधावर १० वृक्षांची लागवड करण्याचा संस्कार वन विभागाने ‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत घालून दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या योजनेने शेतकऱ्यांच्या लेकीचं तिच्या नावाने लावल्या जाणाऱ्या झाडाशी असलेलं नातं अधिक दृढ केलं. २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांच्या काळात ग्रामपंचायत क्षेत्रात साधारणत: ५ लाख ६५ हजार ६७१ मुलींचा जन्म झाला. त्यापैकी योजनेत २ लाख १५ हजार ९५३ इतके ऐच्छिक लाभार्थी निश्चित करण्यात आले. त्यांना योजनेत नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीमार्फत ५ सागाची तर ५ फळझाडाची रोपे देण्यात येणार आहेत. ३३ कोटी वृक्षलागवडीत ही २१ लाख ५९ हजार ५३० झाडं शेतकऱ्यांच्या लेकीच्या नावाने लावली जाणार आहेत.

काय आहे कन्या वन समृद्धी योजना

ज्या शेतकरी दाम्पत्याच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांना वन विभागाकडून पाच सागाची तर पाच फळझाडाची रोपे प्रोत्साहन म्हणून दिली जातात. ५ सागाच्या रोपांशिवाय दिल्या जाणाऱ्या फळझाडांच्या रोपांमध्ये २ रोपे आंब्याची, १ रोपं फणसाचं, १ रोपं जांभळाच तर एक रोपं चिंचेच आहे.  भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन वृक्षांची निवड करण्यात आली आहे.

विकसित होईल उत्पन्नाचा स्त्रोत

मुलीच्या जन्माबरोबर वृक्ष लावल्यास मुलगी जशी मोठी होईल तसे वृक्ष ही मोठे होत जातील. तिच्या लग्नापर्यंत हे वृक्ष मोठे झालेले असतील. फळांनी लगडलेले असतील. त्यातून पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोत देखील विकसित होऊ शकेल. सागाच्या वृक्षांपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून तिच्या विवाहाच्या वेळी आवश्यकता असणारी पैशांची निकड ही भागवता येऊ शकेल.

असा घ्यायचा योजनेचा लाभ

शेतकरी कुटूंबात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्राम पंचायतीच्या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंद करावयाची आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडे विहीत नमुन्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावयाचा आहे.

वन विभागाने जपलं सामाजिक भान

पहली बेटी धन की पेटी, दुसरी बेटी तूप रोटी असं सांगून घरात जन्माला येणाऱ्या लेकीचं स्वागत करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीने घालून दिली आहे. मुळातच मुलामुलीत फरक न करता मुलीच्या जन्माचं स्वागत करायला सांगणारा हा विचारच खूप महत्त्वाचा आहे. याच विचाराला अधिक सशक्त करण्याचं काम विविधस्तरावरून होत असताना शेतकऱ्यांच्या घरी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने दहा झाडे देण्याचा वन विभागाचा हा निर्णय खऱ्या अर्थाने समाधान देणारा आहे.

असंही जोडलं गेलं लेकीचं वृक्षांशी नातं…

वन विभागाने सुरुवातीला वृक्षलागवडीत लेकीचं नातं अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला तो ‘माहेरची झाडी’ या उपक्रमातून. सासरी जाणाऱ्या लेकीची आठवण म्हणून तिच्या हाताने माहेरच्या अंगणात विविध फळझाडांचे वृक्ष लावण्याचा संस्कार महाराष्ट्रात रुजला. आतापर्यंतच्या वृक्षलागवडीत अनेक ठिकाणी सासरी जाणाऱ्या लेकीच्या नावे ‘माहेरची झाडी’ लागली. अंगणात बहरणारं लेकीचं झाडं पाहून सासरीही आपली मुलगी अशीच आनंदी असल्याचे समाधान आई-वडिलांना मिळू लागलं.

सुरक्षित पर्यावरणासाठीही

वाढत्या जागतिक तापमानाचे धोके कमी करायचे असतील तर राज्यात वृक्षाच्छादन वाढावे, सध्याचे २० टक्क्यांचे हरित क्षेत्र राष्ट्रीय वननीतीनुसार ३३ टक्क्यांपर्यंत जावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन राज्याची हरित महाराष्ट्राच्या निर्मितीकडे वाटचाल सुरु आहे. कन्या वन समृद्धी योजनेचे बीजही यातूनच रुजले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button