पंढरपुरचं तुळशी उद्यान – एक नंबर : वारकऱ्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
तुळस असे ज्याचे द्वारी, लक्ष्मी तेथे वास करी, येवोनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे, जे तुळसी घालती उदका, ते नर पावती ब्रम्हसुखा, नामा म्हणे पंढरीनायका… असं म्हणत विठ्ठल आणि तुळशीचे नाते संतांनी अधोरेखित केले आहे. विठ्ठल आणि कृष्णाला तुळस प्रिय.. म्हणून भक्तांनाही ती वंदनीय, पुजनीय.. तुळस विविध विकारांवर गुणकारी म्हणून तिचं आयुर्वेदातील महत्त्व अनन्यसाधारण… अशा तुळशीचा महिमा जर अनुभवायचा आणि पहायचा असेल तर पंढरपुरच्या तुळशी उद्यानाला एकदा आवर्जून भेट द्यायलाच हवी…. नुकतीच आषाढीची वारी झाली.
त्यानंतर मंत्रालयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली वारकरी शिष्टमंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तिथेही एका सुरात वारकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली… “पंढरपुरचं तुळशी उद्यान… नंबर एक…. तुळशी उद्यानामुळे पंढरपुरात स्वर्गच निर्माण झालाय… पंढरपुरला विठ्ठलाच्या चरणाशी उभारलेलं हे तुळशी उद्यान या शहराला नवी ओळख देत आहे.

ते खरं ही आहे. वेगवेगळ्या प्रजातींच्या तुळशी एकाच ठिकाणी पहायच्या असतील तर पंढरपुरच्या तुळशी उद्यानात त्या पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे ती वन विभागाने. नमामी चंद्रभागा अभियानात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात एक हेक्टर परिसरात यमाई तलावानजीक या तुळशी वृंदावनाची निर्मिती करण्यात आली आहे… उद्यानात प्रवेश करताच भाविकाचं लक्ष वेधून घेते ती २५ फुटांची विठ्ठल मूर्ती, भिंतीवरची शिल्पे, प्रतिमा केवळ अप्रतिम.
मन प्रसन्न करणारी, जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् च्या कलाकारांनी रेखाटलेली चित्रे आपल्याशी बोलताहेत असा भास निर्माण होतो इतकी ती जिवंत साकारली आहेत. संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवतांना, शिवाजी महाराजांची ऐतिहासिक भेट, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वारी दृष्य, पादुका घेऊन जाणारी बैलगाडी, अनेक संतांचा जीवनपट या तैलचित्रातून खुप सुंदररित्या साकारण्यात आला आहे.