ऑनलाईन शाळा सुरु असल्या तरीही विद्यार्थ्यांना दिवाळीची सु्ट्टी मिळणार – वर्षा गायकवाड
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा, महाविद्यालये बंद आहेत मात्र, ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे कित्येक महिने विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडला होता. याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. त्यांनी शाळा बंद असल्यातरी शिक्षण चालू ठेवले आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे तसंच त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असंही शिक्षणमंत्र्यांनी आज (४ नोव्हेंबर) माध्यमांशी चर्चा करताना सांगितले आहे. त्यामुळे जरी ऑनलाईन शिक्षण सुरु असले तरी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.