बीएमसी महापौरांची गाडी नो पार्किंग झोनमध्ये
मुंबईत नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करणाऱ्या वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला जात असून पालिकेच्या या मोहिमेला मुंबईकरांनीही साथ दिली आहे. मात्र मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिकेचे नियम धाब्यावर बसवत चक्क नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केल्याचे उघड झाले. महत्वाची बाब म्हणजे पालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा करत महापौरांना दंड ठोठावला नसून त्यांच्याविरोधात कारवाईही केली नाही. त्यामुळे येत्या महापालिका सभागृहात हा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे असून या मुद्द्यावरून विरोधक महापौरांना धारेवर धरण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिका पार्किंग क्षेत्रातील 500 मीटरच्या आवारात असलेल्या ‘नो पार्किंग’ झोनमध्ये अवैधरीत्या पार्क केलेल्या गाड्यांना किमान 5 ते 23 हजारांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला असून ७ जुलै पासून याची अंमलबजावणी करण्यात आली.

