Maharashtra Govमुंबई

राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक – देवेंद्र फडणवीस

मुंबई : दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह महायुतीनेआंदोलनात उडी घेतली आहे. एका बाजूला शेतकरी हितासाठी हे आंदोलन सुरु असताना राज्य सरकारच्या बचावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी धावले आहेत. आणि यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजू शेट्टींवर टीका केली.

दूध दरवाढीच्या मुद्यावरून आज राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये राज्यातील भाजपनेही सहभाग घेतला आहे. राज्यातील अनेक भागात भाजपाच्या नेत्यांनी जोरदार आंदोलनाला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलनात सहभाग घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दूध भुकटीच्या आयातीबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारने दूध भुकटीची आयात केल्याचा आरोप करत आहेत. मात्र केंद्र सरकारने एक ग्रॅम दूध भुकटीही आयात केलेली नाही. तसेच राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, भाजप काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही शुद्ध दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button