एमएचटी-सीईटी परीक्षा १-२० ऑक्टोबरपर्यंत घेतली जाणार !
मुंबई: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकललेल्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. याआधी ९ ऑगस्टला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने जाहीर करण्यात आले होते. एमएचटी-सीईटीच्या परीक्षा आजपासून १ ते २० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. ही परीक्षा २ टप्प्यांत घेतली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात पीसीबी (फिजिक्स-केमिस्ट्री-बायोलॉजी) ग्रुपची परीक्षा असून ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यातील १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ या तारखांना तर दुसऱ्या टप्प्यात पीसीएम (फिजिक्स-केमिस्ट्र-मॅथ्स) ग्रुपच्या परीक्षा १२, १३, १४, १५, १६, १९, २० या तारखांना होणार आहेत.
या एमएचटी-सीईटीसाठी पीसीएम ग्रुपच्या परीक्षेसाठी राज्यातून १ लाख ५० हजार ८९ विद्यार्थी तर परराज्यातून १६ हजार १८ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. पीसीबीसाठी अधिक विद्यार्थी असून १ लाख ९५ हजार २७५ विद्यार्थी आहेत. त्यापैकी राज्यभरातील १ लाख ९२ हजार ७५ आणि राज्याबाहेरचे ३२०० आहेत. पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपसाठी राज्यातून ८९ हजार ८४५ तर परराज्यातून ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.