भिडेगुरूजी व शिवप्रतिष्ठानला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्यास मनाई
पुणे – संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नसल्याचे पत्र पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे पोलिसांना देण्यात आलं. पालखी सोहळ्यात कुणीही घुसू नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली असून पालखीच्या पाठीमागून संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते चालू शकतील. अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. यामुळे उद्या संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांचे समर्थक पुण्यातील जंगली महाराज मंदिरात जमुन सर्व पालख्या पुढं गेल्यानंतर सोहळ्यात सहभागी होतील. शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत संभाजी भिडे आणि कार्यकर्ते चालत जातील. यापूर्वी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते वारकऱ्यांसोबत पालखी सोहळ्यात सहभागी होत. मात्र दोन वर्षांपुर्वी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी यांच्या मार्गात वाद झाला होता. त्यावेळी शिवप्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करू लागले. यावर दिंडी प्रमुखांनी आक्षेप घेतला. यामुळेच गेल्या वर्षीपासुन शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली.

