‘लॉकडाउन’चा फटका लाँड्री व्यवसायालाही
पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’चा मोठा फटका लाँड्री व्यवसायाला बसला असून, जवळपास चार हजार व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून व्यवसाय ठप्प पडल्याने ते हतबल झाले आहेत. दुकानाचे भाडे, ड्रायक्लिन मशीनसाठी घेतलेले कर्ज, हजारो रुपयांचे वीजबिल, कर्मचाऱ्यांचा पगार करायचा कुठून, असा प्रश्न शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील लाँड्री व्यावसायिकांना पडला आहे.
‘लॉकडाउन’मुळे मोठा आर्थिक फटका बसलेल्या व्यावसायिकांमध्ये लाँड्री, ड्रायक्लिनिंग, धोबी व्यावसायिकांचाही समावेश आहे. पुण्यामध्ये चार हजारांहून अधिक जण लाँड्री व्यवसाय करत आहेत. ड्रायक्लिनिंग, धोबी घाटावरील कर्मचारी आणि व्यावसायिकांचीही संख्या मोठी आहे. मार्चमध्ये लग्न समारंभांना सुरुवात होत असल्याने जूनपर्यंत हा व्यवसाय तेजीत असतो. उन्हामुळे वातावरण कितीही तापले तरी ही मंडळी दिवसरात्र काम करतात. यंदा ‘लॉकडाउन’मुळे वीस मार्चपासून सर्व दुकाने बंद करावी लागल्याने या लोकांचे सर्व कामच थांबले आहे.
काही लाँड्री व्यावसायिकांकडे दोन, चार, काहींकडे सहा ते आठ कामगार काम करत आहेत. कपडे इस्त्री केल्यानुसार त्यांचे पगार ठरतात. ही मंडळी बहुतांश स्थलांतरीत असून, पैसे कमाविण्यासाठी त्यांच्याकडे हे एकमात्र स्रोत आहे. या पैशांवर ते घरभाडे, कुटुंबाचा खर्च चालवत असतात. ‘लॉकडाउन’मुळे मालकाला दुकान बंद ठेवावे लागल्याने कर्मचारी हतबल झाले. या लोकांचे पगार देण्याबरोबरच दुकानाचे भाडे, कर्जाचे हप्ते, वीजबिल आणि कौटुंबिक खर्चाचा डोंगर असे अनेक प्रश्न व्यावसायिकांसमोर उभे ठाकले आहे.

