एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तिकिटांच्या दरात आजपासून वाढ

राज्यातील लाखो एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी भाड्यात 13.56 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही दरवाढ आज पासून लागू होणार आहे. डिझेलचे वाढते दर, वाहनांच्या देखभालीचा खर्च, सुटे भाग आणि टायरच्या किंमतीत झालेली वाढ तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमुळे वाढलेला आर्थिक भार लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी ही राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी मानली जाते. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत दररोज लाखो प्रवासी एसटी सेवेचा वापर करतात. त्यामुळे या भाडेवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर होणार आहे.
डिझेल दरवाढ आणि वाढता खर्च ठरला कारणीभूत
राज्य परिवहन प्राधिकरणाने भाडेवाढीला मंजुरी देताना वाढत्या संचालन खर्चाचा विचार केला आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या दरात वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या खर्चावर झाला आहे. याशिवाय वाहनांचे सुटे भाग, टायर, दुरुस्ती आणि देखभाल खर्चातही मोठी वाढ झाली आहे.महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर ताण वाढत असल्याने महसूल आणि खर्च यामधील तफावत भरून काढण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हंगामी 10 टक्के भाडेवाढ रद्द
दरम्यान, यापूर्वी साध्या बससेवेवर लागू करण्यात आलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता सर्व श्रेणीतील बससेवांसाठी नवीन 13.56 टक्के वाढीव दर लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना नवीन दरानुसार तिकिटे घ्यावी लागतील.
प्रवाशांवरील भार कमी ठेवण्याचा प्रयत्न : प्रताप सरनाईक
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, भाडेवाढ निश्चित करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार प्रवासी सेवा सातत्याने उपलब्ध राहावी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी हा निर्णय आवश्यक होता. त्यांनी प्रवाशांना एसटी सेवेवरील विश्वास कायम ठेवण्याचे आवाहनही केले आहे.
गेल्या काही वर्षांत वाढत्या खर्चामुळे एसटी महामंडळाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भाडेवाढीमुळे महसूल वाढण्यास मदत होणार असून सेवा अधिक सक्षम करण्यासाठी निधी उपलब्ध होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.



