Health & FitnessMaharashtra Govऔरंगाबाद (Auragabad)

कोरोनाविरोधी लढ्यात चार कल्पनांची झाली निवड, बास्केट सॅनिटायझरची निर्मिती

औरंगाबाद: ‘सीएमआयए’ (चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर) या उद्योजकांच्या संघटनेने ‘मॅजिक’ उपक्रमांतर्गत नवीन उद्योजकांसाठी एका स्पर्धेचे आयोजन केले होते. यात ११ शहरांतील २३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या सर्वांनी सुमारे ६० कल्पना संघटनेकडे पाठवल्या. त्यापैकी पहिल्या टप्प्यात चार संकल्पना प्रत्यक्षात येत आहेत. यापैकी दोन कल्पना सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या आहेत, तर दोन वस्तूंच्या उत्पादन स्वरूपातील आहेत. या कल्पनांना इन्क्युबेशन सेंटर, मार्गदर्शन, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘सीएमआयए’ मदत करणार आहे. प्रसाद कोकीळ, रितेश मिश्रा, मुकुंद भोगले, सुनील रायठठ्ठा, केदार देशपांडे, रोहित दाशरथी यांनी चार टीमची निवड केली आहे. ‘मॅजिक’चे प्रमुख आशिष गर्दे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

कॉम्पॅक्ट सॅनिटाइझ मशीन

कोरोनापासून बचावासाठी भाज्या, दुकानदार ग्राहकांकडून घेणाऱ्या नोटा, नाणे सॅनिटाइझ करून घेण्यासाठी एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून नुकतेच शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या वरद पत्की याने बास्केट सॅनिटायझरचे डिझाइन तयार केले आहे. हे मशीन ऑटोमॅटिक आहे. ते बास्केटमधून वस्तू सॅनिटाइझ करून घेऊ शकेल.

सिलिकॉन मास्क : कोरोनापासून संरक्षणासाठी मास्क प्रभावी अस्त्र आहे. सिलिकॉन फायबरपासून मास्क तयार करण्याची संकल्पना अजिंक्य भालचंद्र यांनी आणली असून त्याचा प्लॅनही सादर केला आहे. या मास्कचे फिल्टर बदलता येईल, शिवाय तो तुलनेने अधिक टिकावू आणि सॅनिटाइझ करून वापरता येईल, असा दावा करण्यात आला आहे.
परफेक्ट स्किल : या नावाने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. कुठल्याही कंपनीला नोकरभरती करायची असेल तर इच्छुकांना प्रत्यक्ष न बोलावता या अँप्लिकेशनद्वारे त्यांची मुलाखत घेता येईल. विशेष म्हणजे उमेदवार विचारलेले प्रश्न सोडवताना स्क्रीनचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल. हे सॉफ्टवेअरच आपल्याला उमेदवारांची बलस्थाने व उणिवा समाेर आणेल. प्रतीक गाडे आणि क्षितिज देशमुख यांची ही संकल्पना आहे.

प्रयास : वैद्यकीय क्षेत्रासाठी या सॉफ्टवेअर अँप्लिकेशनचा रुग्णालये, रक्तपेढी, शासकीय कार्यालये व रुग्णांचे नातेवाईक यांच्यातील संवाद सहज होण्यासाठी उपयोग करता येईल. शिवाय हॉस्पिटलमध्ये कुठल्याही गोष्टींची कमतरता होऊ नये याकरिता विविध विभाग आणि कार्यालयांशी संपर्क साधता येईल. रुग्णांच्या नातेवाइकांना देखील कायम अपडेट मिळत राहतील. यासाठी पुण्यातील श्रीरंग दिवाकर यांनी ही संकल्पना सुचवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button