कोरोनाच्या साथीच्या बाबतीत मुंबईत ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या धारावीत आता कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी ‘ प्लाझ्मामा दान संकल्प अभियान’
मुंबई : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा कोरोनाच्या रुग्णांसाठी औषध म्हणून उपयोगी ठरतो. यासाठी मनपाने कोरोनातून रोगमुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना आपला वाढदिवस साजरा करू नये, त्याऐवजी कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन केले होते. यानंतर धारावीत ‘प्लाझ्मादान संकल्प अभियान’ सुरु करण्यात आले आहे. ‘कामराज मेमोरियल शाळे’त चार वर्गांत आजपासून रक्तचाचणी सुरू झाली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
धारावीत आतापर्यंत २१०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी ५०० जणांनी प्लाझ्मादान करण्यास होकार दिला आहे. ६० रुग्णांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले असून त्यापैकी २९ रुग्ण प्लाझ्मादान करण्यास पात्र ठरले आहेत. शीव आणि केईएम रुग्णालयांतील डॉक्टर रक्तचाचणी घेत असून सोमवारपासून प्लाझ्मादान मोहिम सुरू होईल, अशी माहिती जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार राहुल शेवाळे यांनी ‘प्लाझ्मादान संकल्प अभियाना’साठी पुढाकार घेतला आहे.

