पंतप्रधान मोदींनी केलेल्या या घोषणेचं रोहित पवारांकडून स्वागत
मुंबई : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाचा विरोध करत असते तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात एक रुपयात सॅनिटरी पॅड देण्याबाबतचा उल्लेख केला आहे. रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या या घोषणेचं स्वागत केलं आहे.
महिला-भगिनींच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाची दखल घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानायला हवेत. समाजात जनजागृतीच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली गोष्ट झाली असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “वैयक्तिक स्वच्छता व त्यातही महिलांची मासिक पाळीचा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पण आपल्या समाजात अजूनही या विषयावर उघडपणे चर्चा केली जात नाही. विशेषतः ग्रामीण भागामध्ये याबाबत दुर्लक्ष होत असल्याचं दिसतं, परिणामी अनेक महिला-भगिनींना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींना सामोरं जावं लागतं. या पार्श्वभूमीवर महिलांना 1 रुपयात सॅनिटरी पॅड देण्याचा पंतप्रधानांनी केलेला उल्लेख हा महत्त्वपूर्ण ठरतो” असं रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं आहे.



