महाड इमारत दुर्घटना : ५ मजली इमारत कोसळल्याची घटना; बिल्डरवर गुन्हा दाखल
रायगड : जिल्ह्यातील महाड येथे तारीक पॅलेस ही ५ मजली इमारत कोसळल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. या दुर्घटनेत आत्ता पर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही १८ ते १९ जण दबले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या इमारतीमध्ये एकूण ४५ फ्लॅट होते. ज्यापैकी १८ फ्लॅट रिकामे होते. इमारतीच्या ए विंग मध्ये ३० जण दुर्घटनेची चाहूल लागताच इमारतीतून बाहेर पडले. आठ जण बेपत्ता आहेत. तर बि विंग मध्ये ६० लोक राहत होते. यापैकी ५१ जण बाहेर पडले. तर ९ जण बेपत्ता आहेत. व दोन इतर असे एकुण १८ ते १९ जण बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणी जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. अजूनही आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे याप्रकरणी जो कोणी दोषी आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच या दुर्घटनेत जखमी किंवा मृत व्यक्तींच्या कुटुंबाला सरकारकडून योग्य ती मदत दिली जाईल. तसेच शहरात ज्या काही जुन्या इमारती आहेत. त्यांच्यासाठी क्लस्टर योजना आणली जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
दरम्यान, एनडीआरएफच तीन पथक बाचाव कार्य करत आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर ६०जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर ढिगाऱ्याखाली अद्याप २५-३० जण अडकल्याची शक्यता आहे, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.