EnvironmentMumbaiठाणे

भांडूप पक्षी उद्यानासाठी ४५ कोटींचा निधी; पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई उपनगरातील पर्यावरण आणि पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाच्या उभारणीला वेग आला आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रकल्पस्थळी पाहणी करून जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती दिली. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य परिसरात उभारण्यात येणारा हा प्रकल्प पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाच्या दृष्टीने मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्थानिक आमदार मिहीर कोटेचा उपस्थित होते.

रामसर क्षेत्रात उभारला जाणार महत्त्वाकांक्षी प्रकल्प

आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य क्षेत्रात, भांडूप पंपिंग स्टेशनलगत सुमारे २०.०९ हेक्टर क्षेत्रात या पक्षी उद्यानाची उभारणी केली जाणार आहे. कांदळवन परिसंस्था, दलदलीचे अधिवास, खारफुटी क्षेत्रे आणि स्थानिक तसेच स्थलांतरित अशा सुमारे २५० पक्षी प्रजातींचे अधिवास असल्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

एआय-आधारित पक्षी निरीक्षणाची अनोखी सुविधा

या प्रकल्पात २.१६ किलोमीटर लांबीचा मॅंग्रोव्ह नेचर ट्रेल, पक्षी निरीक्षण केंद्रे, व्ह्यूइंग डेक्स, बहुमजली वॉच टॉवर्स, बटरफ्लाय गार्डन, जेट्टी, नेचर इंटरप्रिटेशन सेंटर, व्याख्यानगृह आणि बाह्य पार्किंगसह विविध पर्यावरणपूरक पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आधारित पक्षी शोध आणि निरीक्षण प्रणाली असलेले पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र म्हणून या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे.

सर्व आवश्यक मंजुरी प्राप्त

या प्रकल्पाला महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या कार्यकारी समितीने मंजुरी दिली आहे. तसेच महाराष्ट्र इको-टुरिझम बोर्डाची मान्यता, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून आवश्यक सीआरझेड मंजुरी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) तांत्रिक मान्यता देखील प्राप्त झाली आहे.

मुंबईच्या पर्यावरणीय विकासाला नवी दिशा

या प्रकल्पामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे जतन आणि शाश्वत पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. भविष्यात हा प्रकल्प पर्यटक, पक्षीप्रेमी, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरेल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button