बृहन्मुंबई महानगरपालिका - BMC

मतदारांनो सावधान! मतदार नोंदणीच्या नावाखाली बनावट WhatsApp मेसेज; निवडणूक आयोगाचा इशारा

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (CEO Maharashtra) मतदारांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काही मतदारांना WhatsApp आणि मोबाईल संदेशांद्वारे बनावट माहिती पाठवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदेशांमध्ये मतदार नोंदणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याचे सांगून एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जात आहे. निवडणूक प्रशासनाने अशा संदेशांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे बनावट मेसेजमधील दावा?

व्हायरल होत असलेल्या संदेशात मतदाराचे नाव आणि वडिलांच्या नावाशी संबंधित कागदपत्रे जुळत नसल्याचा दावा केला जात आहे. अधिक माहितीसाठी एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. मात्र, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, अशा कोणत्याही संदेशांना प्रतिसाद देऊ नये. संदेशामध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये आणि कोणत्याही व्यक्तीशी बँक खात्याची माहिती, OTP किंवा इतर वैयक्तिक माहिती शेअर करू नये. तसेच कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

❌ हा दावा दिशाभूल करणारा आहे.

अशा बनावट किंवा फसव्या संदेशांना कोणताही प्रतिसाद देऊ नये, त्यामध्ये नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधू नये, तसेच कोणत्याही व्यक्तीशी बँक खात्याची माहिती, OTP किंवा इतर वैयक्तिक माहिती शेअर करू नये आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत.… pic.twitter.com/LMxhFzErZP— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 17, 2026

अधिकृत माहितीसाठी कोणावर विश्वास ठेवावा?

मतदारांनी केवळ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO) किंवा निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) यांनी दिलेल्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. तसेच भारत निवडणूक आयोग (ECI) आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील व सोशल मीडिया हँडलवरील माहितीच ग्राह्य धरावी, असे सांगण्यात आले आहे.

शंका असल्यास 1950 हेल्पलाइनवर संपर्क करा

मतदारांना कोणतीही शंका असल्यास 1950 या मतदार हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जवळच्या निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) कार्यालयाशी संपर्क साधून माहितीची खातरजमा करता येणार आहे.

Related Articles

Back to top button