इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामासाठी आपापल्या संघांची सर्वोत्तम बांधणी करण्याच्या इराद्याने संघमालक लिलाव प्रक्रियेच्या रणभूमीत उतरतील. चेन्नईत गुरुवारी होणाऱ्या ‘आयपीएल’च्या लिलाव प्रक्रियेत २९२ खेळाडूंचे भवितव्य ठरणार असून यापैकी कोणत्या भाग्यवान ६१ खेळाडूंना संघमालकांची पसंती मिळणार, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
‘आयपीएल’चा १४वा मोसम एप्रिल महिन्यात देशातच होण्याची शक्यता अधिक असून या वेळी १६४ भारतीय, १२५ परदेशी आणि तीन संलग्न देशांतील खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या १३व्या हंगामात मुंबई इंडियन्सने जेतेपद मिळवले होते. पुढील वर्षी १० संघ सहभागी होणार असल्याने यंदा मात्र छोटय़ा स्वरूपाच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे.
डिसेंबर २०१९मध्ये झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चांगला भाव मिळाला होता. पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, आरोन फिंच या खेळाडूंना सर्वाधिक बोली लागली होती. परंतु ते आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरले. त्याशिवाय स्टिव्ह स्मिथची राजस्थान रॉयल्स संघातून हकालपट्टी करण्यात आल्याने यंदा मॅक्सवेलसह, स्मिथ, फिंच या खेळाडूंना कोणता संघ संधी देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
त्याशिवाय इंग्लंडचा धडेकाबाज फलंदाज डेव्हिड मलान, मोईन अली यांनादेखील मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. भारताच्या हरभजन सिंग, केदार जाधव या दोघांनाच २ कोटींची आधारभूत किंमत देण्यात आली असून खेळाडूंना ५० लाख ते २ कोटींपर्यंतच्या आधारभूत किंमतीमध्ये विभागण्यात आले आहे. त्याशिवाय सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत छाप पाडणारे मोहम्मद अझरुद्दीन, आर. साईकिशोर, विष्णू सोलंकी यांनासुद्धा संघमालकांची पसंती मिळू शकते.
